सँटियागो – अमेरिकेनंतर जगातील सर्वात बाधित देश ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. येथे एकूण १.२४ कोटी नवे रुग्ण व ३.१० लाखांहून जास्त मृत्यू झाले. देशात आता जगातील सर्वाधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे देशातील अनेक रुग्णालयांसमोर उपचाराचे संकट उभे राहिले आहे. राजधानी ब्राझिलियासह २६ पैकी १६ राज्यांत आयसीयू बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे. ९० टक्के बेड फुल्ल झाले आहेत.
रिओ ग्रँड डो सूल राज्यात आयसीयू केअर युनिटमधील प्रतीक्षा यादी दोन आठवड्यांत दुप्पट झाली आहे. येथे २४० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेस्टिंगा रुग्णालयात अनेक रुग्ण खाटांचा तुटवडा असल्याने खुर्चीवर बसल्याबसल्या उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात लष्कराने रुग्णालयाच्या बाहेर टेंट हॉस्पिटल सज्ज केले. परंतु ही व्यवस्थाही रुग्णांनी भरगच्च झालीये. रुग्णालयाचे संचालक पाउलो फर्नांडो म्हणाले, लोक गंभीर लक्षणे व कमी ऑक्सिजन असताना दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचाराची गरज लागते.
चिलीमध्ये सुमारे निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण झाले. अमेरिकेतील चिलीमध्ये एक टप्पा संपला. परंतु स्थिती हाताबाहेर जात असल्याने देशात रविवारपासून लॉकडाऊन करावे लागले. देशात नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली. शुक्रवारी चिलीत ७,६२६ रुग्ण आढळून आले. कोरोना काळातील ही सर्वाधिक संख्या आहे. इस्रायल, यूएईनंतर चिली हा लसीकरणातील तिसरा देश आहे.