पुणे -करोनातून बरे होणाऱ्या गंभीर रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराचा सामना करावा लागत आहे. जिल्हाभरात या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या आजारावरील औषधांचा तुटवडा भासत आहे.
या औषधांचा पुरवठा व वितरण सुरळीतपणे होण्यासाठी, काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
यामध्ये महसूल, अन्न व औषध, पोलीस या विभागांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणे-12, पिंपरी-चिंचवड-5 तर प्रत्येक तालुकास्तरावर एक अशी 31 पथके स्थापन करण्यात आली आहेत.
नियंत्रण कक्ष स्थापन म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या विचारात घेता ऍम्फोटेरिसिन-बी व इतर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत तसेच साठेबाजी रोखण्यासाठी व वितरण नियंत्रित होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
औषधांचे टंचाईबाबत नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व तहसीलदार अशा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
रुग्णालयांना सूचना
म्युकरमायकोसिसच्या औषधांचे वितरण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे. याबाबतचे आदेश हे सर्व औषध वितरक तसेच रुग्णालयांना बंधनकारक असतील.
खासगी वितरक व रुग्णालयांनी औषधांचा उपलब्ध साठा संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर भरणे आवश्यक आहे.
सर्व रुग्णालयांनी त्यांच्याकडील दाखल रुग्णांची माहिती, एकूण औषधांचा असणारा साठा, औषधांची एकूण मागणी, औषधांची दैनंदिन मागणी नोंदवणे आवश्यक आहे.
असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
या पथकांनी म्युकरमायकोसिस आजारावरील औषधांच्या विक्रेत्यांकडे अचानक भेट द्यावी. औषधांची जादा दराने विक्री, काळाबाजार किंवा इंजेक्शन शिल्लक असतानाही विक्री करीत नाही, असे आढळून आल्यास संबधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. वेळ पडल्यास गुन्हा दाखल करावा.
औषधांचा योग्य वापर होत आहे की नाही, याबाबत तपासणी करून कार्यवाही करावी.
पथकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक मनुष्यबळ द्यावे. संबंधित पोलीस स्टेशनने पथकास बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा.