शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी

मदत वाढवून देण्याची शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीची मागणी

मुंबई :  राज्यातील ओल्या दुष्काळावर घोषित केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून यातून पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही. या गोष्टीचा गांभिर्याने विचार करून वाढीव मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने केली आहे.

राज्यपालांकडून जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्‍टरी 8 हजार रुपये आणि फळबागांना हेक्‍टरी 18 हजार रुपये मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्‍टरी 25 हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी. सोबतच, नुकसान झालेल्या शेतातील जुने पिक बाहेर काढणे, शेतातील गवत आणि इतर कचरा साफ करून रब्बी हंगामसाठी शेती पेरणीयोग्य करण्यासाठी मनरेगा/रोजगार हमीतून मदत करण्यात यावी, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. या मदतीतून मशागतीचा खर्चही निघणार नाही. 2 हेक्‍टर जमिनीच्या क्षेत्राच्या मर्यादेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. यामध्ये मासेमारीच्या नुकसानीची दखल घेतली गेली नाही. निर्णयाचा फेरविचार करुन मदतीत भरीव्‌ वाढ व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.