नवी दिल्ली – भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केलेल्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या जीवनावरील असं एखादं पाखरु वेल्हाळ…’ हा लघुपट लंडन येथील पाईनवूड स्टुडिओजच्या “लिफ्ट ऑफ सेशन्स’ या चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला आहे. त्यासाठी सिनेप्रेमींनी ऑनलाईन मतदान करुन या सिनेमाविषयीची पसंती कळवावी, असे आवाहन निर्माती मृणाल घोळे मापुसकर यांनी केले आहे.
स्मिता पाटील यांचे वास्तविक जीवन आणि पडद्यावरील भूमिका यामध्ये असलेले साम्य आणि त्याबाबत आजच्या पिढीची प्रतिनिधी असलेल्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मृणाल घोळे-मापुसकर यांनी साधलेला संवाद हा या प्रयोगशील लघुपटाचा मुख्य विषय आहे.
कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर कुमार डोंगरे यांनी छायाचित्रण व संपादन केले आहे. ज्योती जाधव यांनी मेक अप, ओंकार पाटील यांनी टायटल मोन्टाज आणि कविता कंजलकर यांनी सबटायटल्सची जबाबदारी सांभाळली आहे.
इंग्लंडमधील पाईनवुड स्टुडिओजच्याच “फर्स्ट-टाईम फिल्ममेकर्स’ या फिल्म फेस्टीव्हलसह भारतातल्या हिमाचल प्रदेश, केरळ आणि नवी दिल्लीतील विविध फिल्म फेस्टीव्हल्समध्ये “असं एखादं पाखरु वेल्हाळ…’ या लघुपटाचे स्क्रीनिंग आजवर झाले असून त्याला नामांकितांची दादही मिळाली आहे.