शॉर्ट फिल्म कॉर्नर : जम्मू आणि काश्‍मीर : पृथ्वीवरील सर्वात ‘वॉर्म’ ठिकाण

या लघुपटाची सुरुवात काश्‍मीरमधील सकाळच्या एका मनमोहक दृश्‍याने होते. नुकतेच लग्न झालेले एक जोडपे काश्‍मीर येथे फिरायला गेलेले असते. सकाळी नूतन तिच्या पती अभिजीतला झोपेतून उठविताना म्हणते, ‘काश्‍मीरमध्ये फक्त झोपायला आला आहेस का?’ असे म्हणून नूतन अभिजीतच्या अंगावरील पांघरूण ओढते. अभिजीत ट्रॅव्हल्सकडून त्यांच्या गाडीची माहिती घेतो. त्याप्रमाणे ते तयार होतात आणि फिरायला निघतात. आणि रस्त्यात एका लाल रंगाच्या गाडीजवळ जाऊन विचारतात, मीर शाह शेख ट्रॅव्हल्सकडून. आणि ते गाडीत बसतात. तेवढ्यात ड्रायव्हरचा फोन वाजतो आणि तो फोनवर बोलून झाल्यावर म्हणतो, क्षमा करा बेगमचा फोन होता. उचलायलाचं लागतो. हे ऐकून अभिजीत म्हणतो, खर आहे. बेगमचा फोन उचलायलाच लागतो. यानंतर कुठे जायचे असे विचारल्यावर नूतन म्हणते, द लेक. आणि लेकजवळ जाऊन बोटीत बसण्याचा आनंद घेतात. काश्‍मीरची मनमोहक, सुंदर दृश्‍ये बघत बोटीतून फिरत असतात. नंतर काश्‍मीरच्या प्रसिद्ध दर्ग्यात जातात. मध्येच अभिजीतला एक फोन येतो पण तो फोन कट करतो. व पुन्हा ते आपल्या जर्नीला सुरुवात करतात.

एका धबधब्याजवळ नूतन मीर शाह यांना फोटो काढायला बोलवते. यावेळी ते आपल्या बेगमचा फोन कट करून त्यांचा फोटो काढतात. पुन्हा एकदा पहाडावर संगीत ऐकताना अभिजीतला फोन येतो. त्याने फोन उचलल्यावर त्याला धक्काच बसतो. तो फोन शेख ट्रॅव्हल्सच्या मीर शाहचा असतो. तो म्हणतो, मी सकाळपासून तुमची वाट बघत आहे. फोनही केले. पण तुम्ही उचलले नाही. सर्वकाही ठीक आहे ना? अभिजीतला त्याचा फोन ठेऊन थेट त्या ड्रायव्हरजवळ जातो. आणि त्याला विचारतो, तुम्ही मीर आहात का? त्यावर तो नकारार्थी मान डोलवतो. नूतन त्याला विचारते, मग तुम्ही का आमच्यासोबत आलात? यावर तो म्हणतो, बेगमने साखर आणण्यासाठी पाठविले होते. रस्त्यात तुमच्यासारखे मित्र भेटले. तर मी विचार केला की, तुम्हाला आमचे घर दाखवावे. काश्‍मीर दाखवावे.

काश्‍मीरमध्ये दगडफेक झाली अथवा कोणतीही हिंसा झाल्यास मैलांवर दूर बसून आपण त्यांना दोषी ठरवतो. पण अनेक वेळा तेथील परिस्थिती आपल्या लक्षात येत नाही. दगडफेक, हिंसा निंदनीय आहेतच. परंतु, तेथील नागरिक ज्या वातावरणात राहतात. ते बदलणे गरजेचे आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातील काश्‍मिरी तरुणांवर हल्ले झाले. परंतु, त्यात त्यांचा काय दोष होता? दोघे-तिघांनी केलेल्या कृत्याची शिक्षा आपण सर्व काश्‍मीरवासियांना का द्यायची? तेही भारताचे नागरिक आहेत. परंतु, आपण त्यांना सामावून घेण्यास आजही कुठेतरी कमी पडत आहोत. काश्‍मीर नेहमी अशांत, युद्धजन्य परिस्थितीत असला तरीही ते पृथ्वीवरचे सर्वात सुंदर स्वर्ग आहे. आणि त्याची आपण कदर करायलाच हवी.

– श्‍वेता शिगवण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.