शॉर्ट फिल्म कॉर्नर : मिसकॅल्क्‍युलेशन

लघुपटाची सुरुवात राम या छोट्याश्‍या मुलापासून होते. दिवस-रात्र तो एका चहाच्या गाडीवर काम करत असतो. मध्यरात्रीच्या सुमारास कबीर आणि रेयांश हे दोन तरुण त्या चहाच्या गाडीजवळ येतात. आणि रामला विचारतात, छोटू, सुट्टा आहे का? राम नाही म्हणाल्यावर कबीर त्याला ऐकवतो. एवढ्या रात्रीतून चहा प्यायला आलो आहे कमीत-कमी एक सुट्टा तरी ठेवायचा. हे ऐकून रेयांश कबीरला समजवतो आणि म्हणतो, जाऊ दे ना स्टेशनवर मिळेल आपल्याला. मग कबीर शांत होऊन रामला खायला काय आहे असे विचारतो. इडली-वडा असल्याचे राम सांगतो. एक प्लेट आणि दोन चहा कबीर ऑर्डर करतो. आणि राम चहा तयार करायला लागतो. आणि रेयांश व कबीर गप्पा मारायला सुरुवात करतात.

रेयांश कबिरला विचारतो यावेळी तुझे इन्सेन्टिव्ह किती वाढले? 225 डॉलर्स ब्रो, असे कबीर रेयांशला सांगतो. पण तू राकेशबद्दल ऐकले का? त्याने आधीच 1500 डॉलर्स क्रॉस केले आहेत. हे ऐकूण रेयांश आश्‍चर्यचकित होतो आणि म्हणतो, अरे काय सांगतोयेस. या महिन्यात त्याच्याकडे किती ग्राहक आहेत? कबीर सांगतो, 52 आधी होते आणि आज अजून एक मिळाला. मग रेयांश म्हणतो, 1500 डॉलर्स किती झाले? 25 गुणिले 53 किती झाले? याचे कॅल्क्‍युलेशन रेयांश मोबाईलवर करतच असतो. तेवढ्यात राम त्यांची ऑर्डर देताना 1325 उत्तर देतो. हे ऐकूण कबीर त्याला हसतो. आणि रेयांशला विचारतो, सांग किती झाले तुझ्या हातात कॅल्क्‍युलेटर आहे. रेयांश म्हणतो, त्याने बरोबर उत्तर दिले आहे. हे एकूण कबीर आश्‍चर्यचकित होतो आणि रामला आपल्याजवळ बोलवून हे कसे केले विचारतो. राम म्हणतो, मी काय केले साहेब. हे ऐकून रेयांश त्याला आणखी एक गणिताचा प्रश्‍न विचारतो,19 गुणिले 38 किती? राम लगेच उत्तर देतो, 722. हे पण बरोबर असल्याचे रेयांश सांगतो. मग कबीरही रामला प्रश्‍न विचारतो की 29 गुणिले 47 किती? 1363 राम चटकण उत्तर देतो. 19 गुणिले 29 किती? 551 राम पुन्हा उत्तरतो. 5+7+19+21+34+21 असा अवघड प्रश्‍न रेयांश रामला विचारतो. तरीही राम न गोंधळता, घाबरता 107 असे त्वरित उत्तर देतो. हे ऐकून रेयांश आणि कबीर दोघेही आश्‍चर्यचकित होतात. आणि कबीर रामला विचारतो, मित्रा तुझ्या डोक्‍यात कॅल्क्‍युलेटर आहे का? राम म्हणतो, नाही साहेब. हे वेदिक गणित आहे. यावर शाळेत जातो का, असे रेयांश त्याला विचारतो.

राम म्हणतो, हो जातो. आता नववीत आहे. म्हणजे होतो. एक वर्ष गॅप राहिली आहे. रेयांश त्याची मजा घेत म्हणतो, आता काय आयएएससाठी तयारी करणार का? आणि दोघेही हसतात. यावर राम म्हणतो, नाही साहेब. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि त्यांची इच्छा आहे की, मी शिकून इंजिनिअर बनावे. परंतु, त्यांचे प्रेम तंबाखू, गुटख्यासमोर कमी पडले. त्यांनी जेव्हा माझे प्रेम आणि तंबाखू, गुटख्याचे प्रेमाची बेरीज केली तर उत्तर शून्य आले साहेब. आणि थोडासा मिसकॅल्क्‍युलेशन झाले. आणि आता त्यांच्या कॅन्सरचा उपचार चालू आहे. या कारणामुळेच यंदा मी शाळेत जाऊ शकणार नाही. हे बोलून राम उदास होतो.

तंबाखू आणि गुटखा हे आरोग्याला हानिकारक असूनही आज कित्येक जण याचे सेवन करतात. परंतु यामुळे कॅन्सरचा धोका उद्‌भवू शकतो. तसेच तंबाखू आणि गुटख्यामुळे केवळ तुमचेच नाही तर तुमचा संपूर्ण कुटुंबीयांचे जीवन उद्‌ध्वस्त होते. तंबाखू, गुटख्याचे सेवन करण्यापासून रोखण्यासाठी आज अनेक स्वयंसेवी संस्था, सरकार जनजागृती करत आहेत. तरीही याचे सेवन करणाऱ्यांच्या प्रमाणात कमतरता दिसून येत नाही. उलट वाढच दिसते. अनेक शाळेतील मुले केवळ फॅशन म्हणून तंबाखू, गुटख्याच्या अधीन होतात. त्यामुळे वेळीच रोखा आणि आपले जीवन आणि कुटुंबीयांची जीवन उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचवा.

– श्‍वेता शिगवण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)