शॉर्ट फिल्म कॉर्नर : इंग्लिश जस्ट अ लॅंग्वेज…

या लघुपटाची सुरुवात एका मुलाखतीपासून होते. बीबीसी या न्यूज चॅनेलमध्ये शोध पत्रकारितेची मुलाखत सुरु असते. गौतम रामलिंगम नावाचा एक उमेदवार मुलाखतकार यांच्यासमोर येतो. ते त्याला बसण्यास सांगतात व इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात करतात. गौतमला त्या पदाबद्दल सांगण्यास सुरुवात करतात. हे पद शोध पत्रकारितेसाठी आहे. तुम्ही किती खोलपर्यंत तपास करू शकता आणि तुम्ही ती केस मांडणार कशी? या सगळ्यावर तुमची निवड होईल.

यानंतर दुसरा मुलाखतकार त्याला केस समजवून सांगतो. त्यानंतर केसमधील व्यक्तीने आत्महत्या केली आहे की हत्या झाली याचा तपास तुम्हाला करायचा असून एक पत्रकार म्हणून तुम्हाला खळबळजनक बातमी करायची आहे. हे ऐकल्यावर गौतम थोडा घाबरतच पुन्हा एकदा सांगण्याची विनंती त्यांना करतो. हे ऐकून मुलाखतकार चिडतो. आणि गौतमला म्हणतो, हा काय इंग्रजी चित्रपट सुरु आहे. ही मुलाखत आहे. तुम्हाला भाषेची समस्या आहे का? आणि तो गौतमला मातृभाषेत पूर्ण प्रकरण पुन्हा एकदा समजवून सांगतो. आणि आपल्या सहकाऱ्यांना सांगतो अशी लोक या पदासाठी कार्यक्षम नाहीत. हे सर्व ऐकून गौतमच्या स्वाभिमान दुखावतो आणि मुलाखतकारांना मध्येच थांबवून गौतम इंग्रजीमध्ये बोलण्यास सुरुवात करतो.

गौतम सदर केस अचूकपणे स्पष्ट करून सांगतो. हे सर्व इंग्रजीमधून सांगितल्यानंतर गौतम म्हणतो, इंग्रजी केवळ एक भाषा आहे. कोणाची बुद्धिमत्ता मोजण्याचे मापक नाही. हे ऐकून सर्व मुलाखतकार गौतमची स्तुती करतात आणि त्याला नोकरी ऑफर करतात.

सर्व प्रादेशिक शाळा आणि सरकारी संस्थांमध्ये तसेच नोकरीच्या ठिकाणी प्रादेशिक भाषांना महत्व देण्यात यावे. यामुळे आपली मातृभाषाही जपण्यात येईल. तसेच कोणतीही घटना दुसऱ्या भाषेपेक्षा मातृभाषेत मांडण्यास अधिक सोपी जाते. परदेशात जरी इंग्रजी भाषेला महत्व असले तरीही अनेक देश चीन, जपानसारखे अनेक देश त्यांच्या मातृभाषेला इंग्रजीपेक्षा अधिक महत्व देतात आणि हाच संदेश दिग्दर्शकला या सिनेमातून द्यायचा आहे.

– श्‍वेता शिगवण

Leave A Reply

Your email address will not be published.