शॉर्ट फिल्म कॉर्नर : विचार बदला; समाज बदलेल

या लघुपटाची सुरुवात एका कंपनीच्या मीटिंगपासून होते. या मीटिंगमध्ये काही वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांची बढतीची यादी बनवत असतात. ही यादी पूर्ण झाल्यानंतर सोफिया कंपनीतील वरिष्ठ पदावर असलेल्या राज यांच्याकडे सोपवते. या यादीमध्ये किरण नावाच्या एका कर्मचाऱ्याचे नाव असते व किरणच्या नावाची शिफारस रजत नावाच्या कंपनीतील एका सिनिअर अधिकाऱ्याने केलेली असते. ही यादी पाहताच कंपनीचे सीईओ प्रकाश किरण बाबत विचारणा करतात. यावर उत्तर देताना राज सांगतो की, किरण रजतच्या टीममधील स्टार-फेस असून तरुण आणि फ्रेशर आहे. दोघे खूप जवळचे मित्र देखील आहेत. फक्त ऑफीससाठीच नाहीतर बाहेरही किरण रजतच्या सर्व प्रोजेक्‍ट्‌मध्ये सोबत असतो. किरण आणि रजत सगळ्यांच्या आधी येतात आणि सर्वात शेवटी ऑफिसमधून बाहेर पडतात.

किरण बाबतची एवढी माहिती ऐकून सीईओ प्रकाश यांना देखील किरण नक्की कोण आहे याबाबत उत्कंठा निर्माण होते आणि ते किरणला बोलावून घेण्यास सांगतात. सीईओंच्या आदेशाप्रमाणे राज किरणला आत बोलवून घेतो. मात्र किरण आत येताच सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसतो. राजतर्फे किरणचं करण्यात आलेलं वर्णन ऐकून सर्वांनाच किरण मुलगी असेल असं वाटलेलं असत मात्र प्रत्यक्षात किरण मुलगी नसून मुलगा असल्याने सर्वच लोक अचंबित होतात.

अनेक वेळा कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांना वेगवेगळी वागणूक दिली जाते. कोणत्याही महिलेची बढती झाल्यास केवळ तिच्या सौंदर्याने झाल्याचे अनेक लोक मानतात. तसेच तिची समाजात बदनामी होते मात्र पुरुष कर्मचाऱ्यांची बढती झाल्यास त्याने केलेल्या कार्यांमुळे झाल्याचे अनेक जण मानतात. मग महिलांना वेगळी वागणूक का? हा प्रश्‍न आजही अनुत्तरित आहे. हा केवळ तुमच्या विचाराचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे विचार बदला समाज आपोआप बदलेल.

– श्‍वेता शिगवण

Leave A Reply

Your email address will not be published.