शॉर्ट फिल्म कॉर्नर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येने भयभीत प्रीतीची कहाणी

या लघुपटाची सुरुवात प्रीती या छोट्या मुलीपासून होते. शाळेत जाण्यासाठी प्रीतीला तिची आई तयार करत असते. प्रीती हातातील आरशातून हळूच आपल्या वडिलांना पाहते. ते तिला पाहून स्मितहास्य करतात व शेतावर जाण्यासाठी निघून जातात. प्रीतीही शाळेत जायला निघते. परंतु, ती शाळेत न जाता आपल्या वडिलांचा पाठलाग करण्यास सुरुवात करते. बाबा शेतात काम करताना पाहून प्रीती सुटकेचा निश्‍वास सोडत शाळेत निघून जाते.

दुसऱ्या दिवशी परत तीच दैनंदिनी. परंतु, आज प्रीतीचे बाबा आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात. हे पाहून प्रीतीला फार वाईट वाटते. घरी आल्यावर प्रीतीला समोर एक रस्सी दिसते आणि ती थोडीशी घाबरते. प्रीती ती रस्सी घेते आणि लपवून ठेवते. रात्री प्रीती बाबांचा हात घट्ट धरून झोपते. दुसऱ्या दिवशी तिचे बाबा शेतावर निघून जातात. हे पाहून प्रीती लगेच रस्सी जागेवर आहे का तपासते. परंतु, रस्सी तेथे नसते आणि घाबरून प्रीती बाबांच्या मागे पळत जाते. शेतात गेल्यावर प्रीतीला बाबा एका झाडाला रस्सी बांधताना दिसतात. ती त्यांना मिठी मारून रडायला लागते, परंतु तिच्या बाबांनी ती रस्सी फाशी घेण्यासाठी बांधली नसते तर प्रीतीसाठी झोका बनविला असतो. ते तिला धीर देतात आणि झोक्‍यावर प्रीतीला बसवून झोका देतात.

दरवर्षी देशभरातील अनेक शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करतात. यंदा एकीकडे शेती पडीक पडली आहे. तर दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी सुकाळ आणि दुष्काळ या दुहेरी कात्रीत सापडला आहे. शेती करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे..? हा प्रश्‍न प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. या आत्महत्या थांबाव्या यासाठी सरकार अनेक योजनांची घोषणा करते. परंतु, त्या राबविण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरतात.

– श्‍वेता शिगवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)