- व्यापाऱ्यांनी दिला होता सात वाजेपर्यंत दुकाने ठेवण्याचा इशारा
पिंपरी – करोनामुळे दुकाने चार वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश असतानाही आम्ही सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवणारच अशी घोषणा पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांनी दिला होता. परंतु महापालिकेच्या भरारी पथकाने साडे चार वाजताच्या सुमारास व्यापाऱ्यांना दुकाने बंद करायला लावली.
दुकानांची वेळ वाढवून मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, सायंकाळी दुकाने बंद करण्यासाठी महापालिकेचे भरारी पथक फिरू लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच, “वीकेंड लॉकडाऊन’लाही अत्यावश्यक वस्तू विक्री दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले या निर्बंधांना न जुमानता व्यापाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा आग्रह धरला होता. पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी सोमवारपासून दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवणार अशी घोषणा देखील केली होती. आज सायंकाळी महापालिकेचे भरारी पथक कारवाईसाठी फिरू लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत दुकाने बंद केली. परंतु आज याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.