हडपसर (प्रतिनिधी) – उपनगरांतील काही भागात जीवनावश्यकसह अन्य दुकाने सुरू झाल्याने अशा दुकानांत खरेदी-विक्री सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात इ-पेमेंटचे प्रमाण वाढले असले तरी किरकोळ दुकानदारांकडून कॅशची मागणी केली जात आहे. परंतु, एटीएममध्ये (ऑटोमेटेड टेलर मशीन) पैसे नसल्याने तातडीने रोख पैसे उपलब्ध होत नाहीत. यामुळे बॅंकांनी एटीएम भरावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पुणे शहर हॉटस्पॉटमध्ये आहे. बहुतांशी बॅंकांची मुख्य कार्यालय शहरात आहेत. शहर पूर्ण लॉकडाऊन असल्याने काही ठराविक बॅंकांची कार्यालयेही बंद आहेत. यामुळे त्यांच्याकडून एटीएम भरणा करण्यासाठी कॅश पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात नाही. यातून उपनगरांतील बॅंकांच्या शाखा तसचे त्याचे एटीएम रिकामे आहेत.
सध्या, पुरेशा रकमेअभावी एटीएम रिकामी असल्याने बॅंक खातेदारांचा मनःस्ताप वाढत आहे. शहरात अतिरिक्त निर्बंध लागू असलेल्या परिसरातील बॅंकांच्या शाखा अद्यापही बंद आहेत. परंतु, त्यांचे एटीएम सुरू आहेत. परंतु, भरणा करण्याची प्रक्रिया अतिशय संथ असल्याने एटीएममध्ये कमी भरणा होतो तर काही ठिकाणचे एटीएम रिकामेच ठेवले जात आहेत. त्यामुळे खातेदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बहुतांश बॅंकांनी एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम कंत्राटी पद्धतीने अन्य कंपन्यांना दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना काम करण्याची परवानगी आहे. परंतु, अशा कंपन्यांतील कर्मचारी, वाहनचालक त्यांच्या गावी गेल्याने भरणा करणाऱ्या कंपन्यांकडेही मनुष्यबळाची कमतरता आहे. याचा परिणाम सर्वच बॅंकांच्या एटीएमवर झाला आहे. आता, सर्वच दुकाने सुरू होत असल्याने खरेदीचे प्रमाणही वाढत आहे यामुळे एटीएम मधून पैसे काढण्याचे प्रमाणही वाढल्याने एटीएम लवकर रिकामी होत आहेत, त्यामुळे तातडीने भरणा करणेही अवघड आहे, असे एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
उपनगरांतील अनेक भागात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनीच रस्ते अडवून ठेवले आहेत. त्यामुळेही एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांना अडचणी येत आहेत. शिवाय एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅश उपलब्ध नसल्याने उपनगरांतील ठराविक एटीएममध्येच भरणा करावा लागत आहे, असे एका खासगी बॅंकेच्या एटीएम विभाग प्रमुखाकडून सांगण्यात आले. गेला सव्वा महिना अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यवहार बंद होते.
आता, दुकाने सुरू झाल्याने बॅंकांत पैसे भरणा करण्यापेक्षा पैसे काढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बॅंकेत दररोज जमा होणाऱ्या रोख रकमेतील चांगल्या नोटा वेगळ्या करून एटीएममध्ये भरल्या जातात. परंतु, बॅंकेत भरणाच होत नसल्याने एटीएमसाठी कॅश शिल्लक राहत नसल्याने बॅंकांकडून सांगितले जात आहे.
पगार काढण्याची लगबग…
महिन्याच्या पहिला आठवड्यात अनेक कंपन्या, संस्थांनी कर्मचाऱ्यांचे पगार केले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच असल्याने बॅंकेत जाण्यापेक्षा पगाराची रक्कम एटीएममधून काढण्यावर अनेकांचा कल आहे. महिन्याचे मानधन जमा झाल्याने निवृत्तीवेतनधारक देखील एटीएममधून निवृत्तीवेतन काढून घेत आहेत, अशा काही कारणांमुळे गेल्या काही दिवसांत एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागला आहे.