चीनकडून पुन्हा दगाफटका ! तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये संघर्ष; २० सैनिक जखमी

सिक्कीम : पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला. पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिकार केला. यामध्ये भारत आणि चीनचे काही सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. परंतु सैन्याकडून या वृत्ताबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, कालच भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडर यांच्यात 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली. चीननेच ही बैठक बोलावली होती. भारतीय सैन्याकडून लेहमधील चौदाव्या कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी चर्चा केली. चीनच्या बीएमपी हट मोल्डोमध्ये झालेल्या या बैठकी नेमका काय तोडगा निघाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सीमेवरील तणाव कमी करावा आणि सैनिक मागे घेण्यासंदर्भात ही बैठक होती.

काही महिन्यापूर्वी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात पॉईंट १४ जवळ दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. पूर्व लडाख सीमेवरील वाद अद्यापी मिटलेला नाही. नऊ फेऱ्यांच्या चर्चेनंतरही काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सिक्कीममधील या घटनेमुळे आता पूर्व लडाखमध्येही तणाव वाढू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.