मोठी बातमी: भिवंडीत शिवसेना शाखाप्रमुखवर गोळीबार

भिवंडी – काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने गोळीबार चुकवल्याने दीपक म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी थोडक्‍यात बचावल्या आहेत.

ठाण्याहून आपले काम आटपून काल्हेरमध्ये परतल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वारांनी म्हात्रे यांच्यावर अचानक गोळीबार केला. यामध्ये हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. वेळीच हा गोळीबार चुकवल्याने म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी बचावल्या.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल्हेर गावात भाजप व सेना ही चुरशीची लढत होत असते. मात्र, विश्वासघात करून भाजपने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवला आहे. आता ही सत्ता जाईल या भीतीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजपनेच हा भ्याड हल्ला केल्याचा संशय म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.