पुणे – मार्केट यार्डातील अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात भरदिवसा दरोडा टाकून 28 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. यावेळी चोरट्यांनी एक गोळी हवेत झाडली. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारा घडली. गुन्हे शाखा आणि मार्केटयार्ड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्ड गेट नंबर-2 मध्ये गणराज मार्केट नावाने इमारतीमागे पोटमाळावजा जागेत दी प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडियाचा व्यवसाय चालतो. येथे शनिवारी सकाळी दोन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरवातीला एक व्यक्ती तेथे आला आणि थेट केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला. यातील एका कर्मचाऱ्याने त्याला बाहेर काढत दार लावून घेतले.
यानंतर त्या व्यक्तीने कोयता काढून केबिनची काच फोडली. तर, त्याच्यामागून आलेल्या दुसऱ्याने पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. यातील एक जणाने केबिनमध्ये घुसून तेथील रोकड बाहेरील व्यक्तीकडे दिली. त्याने ती पिशवीमध्ये भरली. तेथून दोघांनीही पळ काढला. इमारतीबाहेर त्यांनी इतर तीन साथीदार उभे होते.
पैसे लुटल्यावर पाचही जण एकामागे एक पळत थोड्याच अंतरावर लावलेल्या दुचाकीपाशी गेले आणि त्यांनी पळ काढला. हे गुन्हेगार शिवनेरी रस्त्याने पुणे-सातारा रोडच्या दिशेने गेले. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी भेट दिली.
पोलिसांची पत्रे बेदखल
अंगडियांच्या कार्यालयातून रोकड लुटण्याच्या अनेक घटना मागील काही वर्षांत शहरात घडत आहेत. अंगडियांनी खासगी सुरक्षा रक्षक नेमावेत, असे पत्र पोलीस पाठवतात. मात्र, अंगडियांकडून त्याची कधीच दखल घेतली जात नाही. त्यांच्याकडील रोकडीचा हिशेबही पोलिसांना घटनेनंतर व्यवस्थित मिळत नाही. हा व्यवहार चिठ्ठी आणि विश्वासावर चालत असल्याने त्याच्या कोणत्याच नोंदी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. बहुतेक अंगडियांची कार्यालये मध्यवस्तीत अडगळीच्या जागेत आहेत.
“चोरटे चेहरा झाकून कार्यालयात शिरले होते. त्यांची 28 लाखांची रोकड चोरुन नेली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनाक्रम टिपला गेला आहे. त्या आधारे पथके त्यांचा माग काढत आहेत.”
– नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त