द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ‘संजय चक्रवर्ती’ यांचे निधन

चार दशकाच्या कारकिर्दीत अनेक युवा नेमबाज खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन

मुंबई – लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगसह अंजली भागवत यासारख्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे कोच संजय चक्रवर्ती यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. भारताला अनेक नेमबाज देणारे प्रतिष्ठित मार्गदर्शक संजय चक्रवर्ती यांनी शनिवारी रात्री अखेरचा श्‍वास घेतला. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त चक्रवर्ती यांनी चार दशकाच्या कारकिर्दीत अनेक युवा खेळाडूंना मदत करत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यांच्या निधनाबाबत जयदीप करमाकर यांनी ट्‌विट करत माहिती दिली. करमारकर यांनी ट्‌विट केले की, द्रोणाचार्य पुरस्कार विजेता नेमबाज प्रशिक्षक आणि मेंटर संजय चक्रवर्ती सर यांचे मुंबईत दु:खद निधन झाले. आम्ही एक महान खेळाडू आणि मार्गदर्शक गमाविला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या या दु:खात आम्ही सर्वजण संवेदना व्यक्‍त करत आहे.

संजय चक्रवर्ती यांच्या निधनाबद्दल भारतीय राष्ट्रीय रायफल संघाने (एनआरएआय) देखील शोक व्यक्‍त केला आहे. एनआरएआयने म्हटले आहे की, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजय चक्रवर्ती यांच्या मृत्यू ही नेमबाज क्षेत्रासाठी दु:खद घटना आहे. ते संजय सर म्हणून ओळखले जात होते. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या अनेक नेमबाजांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद कामगिरी केली आहे. तसेच काही नेमबाजांनी राजीव गांधी खेळ रत्न आणि अर्जुन पुरस्कारही पटकाविले आहेत.

दरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरणानेही (साई) एक ट्‌विट करत शोक व्यक्‍त केला आहे. तसेच ऑलिम्पियन सुमा शिरुर यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.