मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील शूटर शिवकुमारला आज एसटीएफ उत्तर प्रदेश आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईतून अटक करण्यात आली आहे.
आरोपी शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. एसटीएफ टीमचे नेतृत्व प्रमेश कुमार शुक्ला आणि जावेद आलम सिद्दीकी करत होते. तसेच अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत 19 जणांना अटक
शिवकुमार हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर आहे. तो थेट लॉरेन्स गँग सिंडिकेटच्या संपर्कात होता. लॉरेन्स गँगच्या सर्व सूचना त्याच्या मोबाईलवर येत होत्या. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरला जाणार होते. तिथे त्याला लॉरेन्स गँगच्या एका गुंडाला भेटायचे होते.
हत्येनंतर मुंबई पोलीस तत्काळ शिवकुमारच्या शोधात ओंकारेश्वर येथे आले, मात्र तो तेथे सापडला नाही. बाबा सिद्धी हत्येप्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन मुख्य शूटर धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार गौतम यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
शूटर शिवकुमारने केला मोठा खुलासा
तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. चौकशीदरम्यान खुलासा केला की, हे हत्याकांड परदेशात बसलेल्या अनमोल बिश्नोईच्या सूचनेवरून घडवून आणले होते. शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, शुभम लोणकरने त्याला अनमोल बिश्नोईशी बोलायला लावले होते.