देहूरोड – पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड सेंट्रल चौक येथील एका उंच विजेच्या टॉवरवर चढून बसलेल्या तरुणाला खाली उतरविण्यास तब्बल अडीच तास हा थरारानंतर स्वतःहून तो खाली उतरला. मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्याला खासगी वाहनातून रवाना करण्यात आले.बोर्ड प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य न मिळाल्याचे खंत पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी व्यक्त केले.
विशाल काकडे (वय 32, रा. धनकवडी) असे या तरुणाचे नाव समजले. कात्रज बाह्यवळण रस्त्याने बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जाणाऱ्या एका तरुणाने त्याला टॉवर चढलेला पाहिले. सामाजिक भान जोपासत त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
रात्री नऊच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची वाहने बघून येणाऱ्या-जाणाऱ्यांनीही वाहने थांबून येथे गर्दी केली. पोलीस त्याला खाली येण्याचे आवाहन करीत होते. त्याला कुठलाही प्रतिसाद न देता तो आणखी वर चढत जात होता. त्याने टॉवरचे सर्वोच्च टोक गाठले तेथून बऱ्याच वेळानंतर तो हळूहळू खाली येऊ लागला. पण तो खाली येत नव्हता. साडेअकराच्या सुमारास बघ्यांची गर्दी कमी झाली. पोलीसही हतबल झाले. गडबड गोंधळ कमी झाल्यामुळे तो स्वतःहून खाली उतरला. अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला उत्तरे देता येत नव्हती.
एकंदरीत अंदाज घेऊन तो मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा मानस झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याला खासगी वाहनातून चिंचवडच्या दिशेने पाठविण्यात आले. दरम्यान देहूरोड कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. मदत तर नव्हेच घटना स्थळावर आलेच नाही, तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.