कोपरगाव – घरकुल मिळावे, या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावात एकाने हटके आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. घरकुलाच्या मागणीसाठी संपत डिबरे याने थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली झाली.
हक्काचे आणि पक्क घर मिळावे अशी पंतप्रधानांची योजना आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक जण घरकुल योजनेपासून वंचित राहात असल्याचे समोर आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे नावे वगळली जात असल्याचे कारण देत स्थानिक प्रशासन देखील हातवर करत असल्याने गरजूंना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या “ड’ यादीत नाव नसल्याने तालुक्यातील टाकळी येथील संपत डिबरे पाण्याच्या टाकीवर चढून “शोले स्टाईल’ आंदोलन केले.
संपत डिबरे हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ उडाली. कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. सर्वजण डिबरे यांना टाकीवरून उतरण्यासाठी विनंती करत होते.
मात्र डिबरे काही केल्यास ऐकायला तयार नव्हते. अखेर गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, गटविकास अधिकारी आणि पोलिसांनी याप्रकरणी योग्य तो पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने तासाभरानंतर डिबरे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, संपत डिबरे यांच्या या आंदोलनामुळे उपस्थितांना शोले चित्रपटाची आठवण झाली.