बीडः मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चर्चेत आहे. या हत्या प्रकरणात आत्तापर्यत सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून अद्याप कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना केली आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केली. त्याचे व्हिडिओ बघतले म्हणून बीडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक मोहिते असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांना कर्नाटकमधून ताब्यात घेत अटक केली आहे.
ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील करनळी गावातील आहे. या गावातील अशोक मोहिते नावाचा तरुण खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याचे व्हिडिओ मोबाईवर पाहत होता. त्यावेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन तरुणांनी हे पाहिले. यानंतर वाल्मिक कराड याचे व्हिडिओ का पाहत आहे अशी विचारणा केली. यानंतर त्यांनी अशोक मोहितेला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत अशोकला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपाचार करण्यात येत आहे. डॅाक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी आंधळेचे मित्र?
अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. या दोघांनाही काल रात्री उशिरा पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले. हे दोघेही फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अशोक मोहिते हे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. ते धारुरच्या पोलीस स्टेशनमध्ये होमगार्डमध्ये नोकरीला करतात.