पाटणा – पत्रकार राजदेव नंदन यांच्या हत्या प्रकरणात साक्षीदार असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती सीबीआयने बिहारच्या कोर्टात दिली होती. तसेच तिचा मृत्यू रिपोर्टही सीबीआयने कोर्टात दाखल केला होता. पण आज खुद्द ही महिलाच कोर्टात हजर झाल्याने सीबीआयचे चांगलेच हसे झाले. काही वर्षांपूर्वी ‘जॉली एलएलबी’ हा चित्रपट आला होता. त्यात पीडित व्यक्तीलाच मृत घोषित करण्यात आलं होतं. मात्र वकिल पीडित व्यक्तीला कोर्टात हजर करतात. त्यानंतर एकच गोंधळ उडतो. असाच काही जॉली प्रकार बिहारमध्ये पाहायला मिळाला.
मुजफ्फरपूरच्या सिव्हील कोर्टात आज ही महिला स्वत:च हजर झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. ती न्यायाधीशांना उद्देशून म्हणाली हुजुर मै जिंदा हुँ, सीबीआयवालोनेही मुझे मृत घोषित किया है. त्यावेळी कोर्टात उपस्थित असलेले सगळेच अचंबित झाले. या प्रकरणी कोर्टाने सीबीआयकडे तातडीने स्पष्टीकरण मागितले आहे.
बदामी देवी असे या महिलेचे नाव आहे. पत्रकार राजदेव नंदन यांच्या हत्या प्रकरणात तिची साक्ष नोंदवली जायची होती. पण सदर महिला मरण पावल्याचे सीबीआयकडून कोर्टात सांगण्यात आले होते. याच महिलेचे घर बळकावण्याचा प्रयत्न काही गुंडांनी चालवला होता. त्या प्रकरणात पत्रकार राजदेव यांनी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे गुंडांनी त्यांचीच हत्या करण्याचा प्रकार घडला आहे.
बदामी देवीने आज कोर्टात येऊन सांगितले की आपले वय आता 80 च्या पुढे गेले आहे. पण आरोपी आणि तपास अधिकारी यांच्यातच मिलीभगत आहे. त्यांनी खोटेपणानेच मला मृत घोषित करून घर बळकावण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यानंतर कोर्टाने सीबीआयची चांगलीच हजेरी घेतली. विशेष म्हणजे पत्रकार राजदेव यांची हत्या करणारी गुंडांची टोळी माजी खासदार शहाबुद्धीन यांच्याशी संबंधीत आहे असे सांगण्यात येते.