नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तरुणीला कारने तब्बल १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना नुकतीच घडली.दरम्यान, अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका स्कूटी चालक महिलेला ट्रकने धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अपघातात मृत महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्याने ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही जळून खाक झाली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित महिला एका विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होती अशी माहिती समोर आली आहे.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बीके गुप्ता यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव पुष्पा असून त्या विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होत्या. अपघात झाला तेव्हा त्या घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्या स्कूटरवरून जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रकने पीडितेला तीन किलोमीटरपर्यंत ओढत नेले.
यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला पण चालक थांबला नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पीडित महिला मूळच्या लखनऊ येथील रहिवासी होत्या. ट्रकच्या डंपरमधून त्यांचा मृतदेह काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी चालक फरार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.