कोल्हापूर – कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर धक्कादायक घटना घडली आहे. कचऱ्याचे विलगीकरण करताना जेसीबीच्या फावड्याचा दात घुसून स्क्रॅप शोधणाऱ्या महिलेचे शीर धडावेगळं झालं. रविवारी सकाळी ही घटना घडली असून या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जेसीबी चालकांना ताब्यात घेतलं आहे.
घटनास्थळी महिलेचे धड मिळाले, पण शीर तुटून कचऱ्याबरोबर ढिगाऱ्यात गायब झाल्याने सुमारे तीन तासाच्या अथक शोधानंतर ते कचऱ्यातच सापडले. मंगल राजेंद्र दावणे (वय ६० रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे ठार झालेल्या महिलेचं नाव आहे.
संपूर्ण शहरातील कचरा कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर टाकला जातो. रविवारी अनेक महिला कचऱ्यात स्क्रॅप शोधत होत्या. त्याचवेळी डंपीग ग्राउंडवर जेसीबीद्वारे कचरा हलविण्याचे काम सुरू होते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामागील खड्ड्यात मंगल दावणे स्क्रॅप शोधत होत्या. जेसीबी चालकाला याचा अंदाज आला नाही. त्याने नेहमीप्रमाणे कचरा उचलला. त्याचवेळी जेसीबीचे दात स्क्रॅप गोळा करत असलेल्या महिलेच्या मानेत घुसले आणि त्यांचा जागीचा मृत्यू झाला.