वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट येथील एका तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न नंदोरी चौकात झाला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित तरुणी एका महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकवण्याचे काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
विक्की नगराळे या नराधमाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विक्कीला टाकळघाट परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही एकाच दारोडा गावचे रहिवाशी आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या हल्ल्यात तरुणी 35 टक्के भाजली असून तिचा चेहरा पूर्णत: भाजला आहे. तरुणीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धूर गेल्याने तिची वाचा देखील गेली आहे. तसेच तिची दृष्टीही राहिल की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तिच्यावर सध्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की आणि पीडित तरुणीचा तीन महिन्यांपूर्वीही बसमध्ये वाद झाला होता. पीडित तरुणीची इच्छा नसताना विक्कीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना कळवले होते. आरोपी विक्कीने शांत डोक्याने नियोजन करुन तरुणीवर हल्ला केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.