चंद्रपूर : चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांपूर्वी साखरपुडा झाला असतानाही होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने एका तरुणीने त्याच्याच कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने फाशी घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर आज सकाळी एका तरुणीने गळफास घेतलेले आढळून आले. काल पहाटे पौर्णिमा मिलिंद लाडे मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. ही तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या कोरेगाव (चोप) येथील रहिवाशी असून, सचिन शेंडे या ब्रम्हपुरीत राहणाऱ्या तरुणासोबत दीड वर्ष आधीच तिचा साखरपुडा झाला होता. सचिन हा ब्रम्हपुरीच्या दिवाणी न्यायालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
साखरपुडा झाल्यानंतरही होणारा नवरा लग्नास टाळाटाळ करत असल्याने मुलीने टोकाचे पाऊल उचलले आणि त्याच्याच कार्यालयाच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारी वरून सचिन शेंडेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र ब्रम्हपुरीमधील दिवाणी न्यायालयाच्या अगदी प्रवेश द्वारावर मृतदेह आढल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक आणि पोलीस यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी घटनास्थळी झाली होती.