नवी दिल्ली : करोनाला रोखण्यासाठी देशात नुकतेच काही लसींना मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने मागील काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ड्राय रन घेतला. हा ड्राय रन यशस्वी झाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. लसीकरणादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यामध्ये असणारे दोष दूर करता यावेत यासाठी ड्राय रन घेण्यात आल्या होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात या ड्राय रांचा चांगलाच फज्जा उडाल्याची माहिती समोर आली आहे.
वाराणसीमधील ड्राय रनदरम्यान आरोग्य कर्मचारी चक्क सायकलवरुन करोनाची लस घेऊन रुग्णालयात दाखल झाला आणि अनेकजण गोंधळात पडले. रुग्णालयामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले मात्र लस रुग्णालयापर्यंत कशी पोहचवली जाईल यासंदर्भातील ड्राय रनमध्ये प्रशासनाची कोणतीही तयारी दिसून आली नाही. वाराणसीमधील चौकाघाट करोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात चक्क सायकलवरुन लस पोहचवण्यात आली.एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे
विशेष म्हणजे ही लस रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथेही कोणतीच तयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. करोनाची लस केंद्रापर्यंत पोहचवताना ती योग्य तापमानात राहील, ती केंद्रापर्यंत कशी पोहचलवी जावी यासाठी काय खबरदारी घ्यावी याचा सराव या ड्राय रनमधून होणे अपेक्षित होते. मात्र त्या उलट चक्क सायकलवरुन लस केंद्रावर पोहचवण्यात आल्याने उत्तर प्रदेश सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यासंदर्भात वाराणसीचे मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. व्ही. बी. सिंह यांनी सायकलवरुन लस पोहचवण्यात आल्याचे मान्य केले आहे. पाच केंद्रांवर व्हॅनने लस पोहचवण्यात आली. केवळ महिला रुग्णालयामध्ये सायकल कॅरियरच्या माध्यमातून लस पोहचवण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी लसीकरणासंदर्भातील ड्राय रनचे नियोजन करण्यात आले आहे.
ड्राय दरम्यान कोणालाही प्रत्यक्षात लस दिली जात नसून लस केंद्रापर्यंत कशी पोहचले, ती आरोग्य केंद्रात कशापद्धतीने ठेवली जाईल यासंदर्भातील तपासणी आणि तयारी कुठपर्यंत आलीय याची चाचणी ड्राय रनच्या माध्यमातून केली जात आहे. असे असतानाही उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणासंदर्भातील पूर्वतयारीचा फज्जा उडल्याचे चित्र दिसत आहे.