अमरावती : महायुती सरकारने राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत दर महिन्यला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. यामुळे ही योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यादरम्यान अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी या योजनेवरून एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रवी राणा?
आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले.
काय आहे लाडकी बहीण योजना?
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना‘ असं या योजनेचे नाव आहे. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे. एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.