संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून कालपासून एकापाठोपाठ एक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत, त्यातच याठिकावरून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून एका सरपंचाचा संताप झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी चक्क दोन लाख रुपये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
भ्रष्ट अधिकारी विहिरीच्या कामासाठी लाच मागत असल्याचा आरोप करत या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा कार्यालयाच्या बाहेर हवेत उडवल्या आहेत. विहिरीसाठी लाच मागत असल्याचा आरोप करत गेवराई पायगा येथील मंगेश साबळे या सरपंचाने गावातील शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये गोळा केले होते.
त्यानंतर फुलंब्री पंचायत समिती समोर या नोटांच्या बंडलाचा हार गळ्यात घालून त्यातील नोटा हवेत उडवत मंगेश साबळे यांनी आंदोलन केले आणि अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला.
या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये सरपंच मंगेश साबळे हे दोन लाख रुपये हवेत उडवताना दिसत आहेत. यावेळी साबळे यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.