यवतमाळ – देशभरामध्ये ३१ जानेवारीपासून राष्ट्रीय पोलिओ लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र यवतमाळ येथे पोलिओ लसीच्या नावाखाली १ ते ५ वयोगटातील मुलांना चक्क सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
जिल्ह्यातील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथील पोलिओ लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडला. पोलिओ लस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या १२ लहान बालकांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलंय.
यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.
मुलांना लस म्हणून सॅनिटीझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
संपूर्ण प्रकार गंभीर असून यात कोणाकडून ही चूक झाली याची चौकशी सुरू आहे. ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजार होते. तिघांपैकी कुणाकडून ही चूक झाली याचा तपास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत आहेत.