कोटा : कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाने कुलर लावण्यासाठी व्हेन्टिलेटरचा प्लग काढल्याने ४० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थान येथील कोटा येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटा येथील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक रुग्ण दाखल झाला होता. सुरवातीस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याठिकाणी त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी उकाडा असल्यामुळे कुलर आणला होता. परंतु कुलर चालू करण्यासाठी तिथे इलेक्ट्रिक सॉकेट न मिळाल्याने आणि त्यांनी त्या रुग्णाच्या व्हेन्टिलेटरचाच प्लग काढून त्याठिकाणी कुलर चा प्लग लावला.
जवळपास अर्ध्या तासाने रुग्णाची प्रकृती बिघडण्यास सुरवात झाली. रुग्णालय प्रशासनाने त्याची तपासणी केली परंतु दुर्दैवाने ते रुग्णास वाचवू शकले नाही. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून विलगीकरण कक्षातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून चौकशी अहवालात जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे डॉक्टर म्हणाले.