बारामती : अनेकदा चुकीची औषधे घेतल्यामुळं शरिरावर दुष्परिणाम होतात. मात्र बारामतीत एक विचित्र घटना घडली असून पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विष प्राशन केलं आहे. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काम करत असलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव पोपट दराडे आहे.
बारामती ग्रामीण पोलीसमधील दराडे यांनी खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे (वय 45), हे आपली ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून शेतीत फवारणी करण्याचे (टू फोर्टी) औषध प्राशन केले. दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, मी हे औषध प्यायलो आहे,असे सांगितलं.
दरम्यान घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णलायात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दराडे यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील अकोले आहे. दराडे यांना दोन मुले पत्नी असून त्यांनी पोलीस सेवेत 24 वर्षे आपली सेवा बजावली आहे. पुणे शहर, देहूरोड, इंदापूर, बारामती शहर व गेली पाच वर्षे ते बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत होते.