धक्कादायक ! लसीकरण केंद्रावर होतोय नागरिकांच्या जीवाशी खेळ; लसीऐवजी देताय पाण्याचे डोस

मुंबई  – जगभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तेथील नागरिक टाळाटाळ करत आहेत.

तर काही ठिकाणी लोकांच्या मनात लसीबाबत अनेक संभ्रम असल्यामुळे लोकांकडून लसीकरण केंद्रावर हल्ले होत आहे. यातच लसीकरणाच्या मुद्यावरून नागरिकांची फसवणूक केल्याची घटना समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर  लसींऐवजी कुप्यांमधून पाण्याचे डोस देण्यात येत आहेत.पश्चिम उपनगरातील सोसायट्या, महाविद्यालये, प्रोडक्शन हाउसमध्ये  लसीकरणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. अशी  जनहित याचिका सिद्धार्थ चंद्रशेखर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

यावर आता न्यायालयाने मुंबई पोलिसांना हिरानंदानी सोसायटीप्रकरणी तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. निर्दोष नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची कोणालाही परवानगी नाही. अशा पद्धतीने होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेने तातडीने धोरण आखावे, असे न्यायालयाने मुंबई पोलिसांना म्हटले आहे.

रॅकेटचा शोध घ्या

बोगस लसीकरणाचे प्रकार हे मुंबई उपनगरातील कांदिवली आणि बोरिवली या परिसरात प्रामुख्याने घडले आहेत. त्यात हौसिंग सोसायटी, महाविद्यालये, फिल्म्स प्रोडक्शन हाऊस अशा ठिकाणी बोगस लसीकरण झाले असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आल्याने या रॅकेटचा तसेच प्रमुख सूत्रधाराचा शोध घ्या. तसेच शक्य असल्यास तूर्तास मुंबईतील सोसायटय़ांमधील खासगी लसीकरण थांबवा, अशा सूचना खंडपीठाने दिल्या.

त्याचबरोबर नागरिकांनाही अशा बोगस लसीकरणापासून वाचण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला खंडपीठाने दिला. सोसायटीमध्ये लसीकरणासाठी खासगी रुग्णालयातून येणाऱया व्यक्तीचे ओळखपत्र तपासणे, त्यांनी आणलेली कागदपत्रे, लसीकरणासंबंधित वस्तूंची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.