धक्कादायक ! भाजप खासदाराने घरात दडवल्या होत्या असंख्य ‘ऍम्ब्युलन्स’; असा झाला भांडाफोड

नवी दिल्ली  – बिहारमधल्या सरण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रूडी यांच्या घरात ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या तीस रुग्णवाहिका सापडल्या आहेत. माजी खासदार पप्पू यादव यांनी ही बाब उजेडात आणली आहे. त्यांनी म्हटले आहे की बिहारमध्ये असंख्य रुग्णांचे हाल सुरू असताना त्यांच्यासाठी आणल्या गेलेल्या या रुग्णवाहिका भाजप खासदाराने पळवल्या आणि त्यांनी त्या आपल्या घरात नेऊन ठेवल्या आहेत. या तीस रुग्णवाहिका असल्याचे त्यांनी पत्रकाराच्या निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की, येथे आणखी 100 रुग्णवाहिका होत्या. पण त्या अन्यत्र हलवण्यात आल्या आहेत. हा मोठा गफला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

तथापि, यावर खुलासा करताना राजीवप्रताप रूडी यांनी म्हटले आहे की येथे केवळ 20 रुग्णवाहिका आहेत. त्या चालवण्यासाठी चालकच उपलब्ध न झाल्याने आम्ही त्या जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्त करू शकलो नाही असा मासलेवाईक दावा त्यांनी केला आहे. रुग्णवाहिका चालवू शकणाऱ्या डॉक्‍टरांकडेही याबाबत विचारणा केली होती पण त्यासाठी कोणीही तयार झाले नाही असे राजीवप्रताप रूडी म्हणाले.

रूडी यांच्या सरण जिल्ह्यातील मधौरा गावात या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आल्या होत्या. यादव यांनी आपल्या समर्थकांसह तेथे जाऊन या रुग्णवाहिकांवरील ताडपत्री हटवून त्या पत्रकारांना दाखवल्या. त्याचे व्हिडिओ सध्या बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. खासदार निधीतून या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले आहे. पप्पू यादव यांनी तेथे नेलेल्या जमावाबरोबर अनेकांनी आपले ड्रायव्हिंग लायसन्स लोकांपुढे दाखवून आम्ही या रुग्णवाहिका चालवू शकतो असे म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.