वर्धा – समुद्रपूर तालुक्यातील सावंगी येथे रविवारी घरातच आई-मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे अशी मृतांची नावे आहेत. मृत आई व मुलगी कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत. शासकीय रुग्णालयात दोघींची करोना चाचणी करण्यात आली होती. या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. कोविडबाबतची दक्षता घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. सुभद्रा आणि सुरेखा या माय-लेकींचा मृत्यू करोनामुळेच झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता, दोघींचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.