नवी दिल्ली : भारतात करोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होत नाही. उलट हा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. दरम्यान, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत ७७ हजार २६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्तने वाढत आहे. गेल्या आठवड्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ६० ते ६५ हजाराने वाढत होती.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ इतकी झाला आहे. गेल्या २४ ताासंत ७७ हजार २६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादाय बाब म्हणजे २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
देशात करोना चाचणीची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. दिलासादायक म्हणजे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात सध्या सात लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६१ हजार ५२९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.