कोल्हापूर – कागल तालुक्यातील फराकटेवाडी येथील प्रियकराने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिजित फराकटे असे या प्रियकराचे नाव आहे. गर्लफ्रेंडच्या वडिलांनी अभिजितच्या घरी जाऊन तलवारीचा धाक दाखवत धमकी दिली होती. यामधूनच हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुलीच्या वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अभिजितचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या वडिलांना याबाबत कुणकुण लागली असता त्यांनी थेट अभिजितच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ केली. यावरच न थांबता त्यांनी तलवारीचा धाक दाखवत धमकीही दिली. या सर्व प्रकारामुळे अभिजित घाबरून गेला.
आपल्या गर्लफ्रेंडचे वडील मारणार या भीतीने त्याने घरात असलेले विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविले. अभिजीतच्या कुटुंबीयांना याबाबत समजले असता त्याला तत्काळ कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.