पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने (वय ४७) यांचे आज (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या दरम्यान चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना २५ जून रोजी करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर चिखली परिसरातून तीन वेळा निवडून आले होते. गतवर्षी त्यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचीही जबाबदारी सांभाळली होती. एक झुंजार, आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्त्व अशी त्यांची ओळख होती. लॉकडाऊन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत करत अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता.
25 जून रोजी त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना करोनासह निमोनियाचा देखील त्रास होता. आज उपचार सुरू असताना त्यांच्या दुख:द निधन झाले. साने यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला असून त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे