बंगळुरू – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमती आणि साथीमुळे कमी झालेले उत्पन्न यामुळे आर्थिक समस्यांनी ग्रासलेल्या एका टॅक्सी चालकाने स्वत:ला पेटवून घेत बंगळुरू विमानतळापुढे आत्महत्या केली. त्यानंतर बंगळुरूमधील टॅक्सीचालकांनी संप केला. बंगळुरू विमानतळाने या बाबतची सल्ला देणारी सूचना जारी केली आहे.
केम्पेगौडा विमानतळाजवळ प्रवासी घेण्याच्या थांब्यावर 35 वर्षीय टॅक्सीचालकाने मंगळवारी सायंकाळी पेटवून घेतले. त्याची ओळख पटली आहे. तो रामनगर जिल्ह्यातील असून त्याचे नाव प्रताप आहे. त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेण्यापुर्वी स्वत:ला टॅक्सीत कोंडून घेतले होते.
त्याने पेटवून घेतल्यानंतर आजूबाजूचे टॅक्सीवाले, आणि विमानतळाच्या अग्नीशामक यंत्रणेचे कर्मचारी ती आग आटोक्यात आणेपर्यंत तो 70 टक्के भाजला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्याच्या मोटारीचे हप्ते थकल्याने तो मानसिक तणावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही खासगी कॅब चालक सवलतीच्या दरांत सेवा देत असल्याने त्यानंतर काही टॅक्सीचालक एकत्र येऊन त्यांनी निदर्शने सुरू केली. कर्नाटक ओला उबेर चालक आणि टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष तन्वीर पाशा म्हणाले, या 35 वर्षीय चालकाचा मृत्यू 70 टक्के भाजल्याने झाला. त्यामुळे संघटनेला संपाचा निर्णय घ्यावा लागला.
महागाई आणि इंधनाच्या दरात झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे आम्हाला आमचा एक सहकारी गमवावा लागला, हे दुर्देवी आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन लावल्यापासून आमची रोजी रोटीचा खर्च सुटणेही मुश्किल झाले आहे, त्यातून आता कोठे सावरत असताना पुन्हा या इंधन दरवाढीचे नवे संकट उभे राहीले आहे. त्यातच काही खासगी कॅब सेवा सवलतीच्या दरात सेवा देत आहेत.
कॅब संचालक प्रती फेरी कमी पैसे देऊ लागले आहेत. त्यांना बाजारपेठ काबीज करायची असल्याने ते सवलतीच्या दरांची घोषणा करतात. त्यामूळे सर्व टॅक्सीचालकांसाठी एक समान दर निश्चित करावा आशी आम्ही राज्यसरकारकडे मागणी केली आहे, असे ते म्हणाले.