कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा कारागृह वारंवार कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत राहत असते. आता कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे. निशिकांत बाबुराव कांबळे असे या घटनेत मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.
मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार निशिकांत आणि चार कैद्यांमधील वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली. हाणामारीत निशिकांतला बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
कोल्हापुरातील कळंबा जेल नेहमीच चर्चेत असतं. जेलमध्ये याआधी क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने कळंबा कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन टेनिसबॉलमधून 15 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.
त्याआधी कारागृह पोलिसाच्या बुटाच्या बॉक्समध्ये दोन चिठ्ठ्यांमधून कैद्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले होते. कधी या कारागृहामध्ये मोबाईल, सिम कार्ड, चार्जर इतकंच काय पण गांजा देखील सापडल्याचे समोर आले होते.