कोल्हापूर – चार मुलांना विष पाजून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. बेळगावी जिल्ह्यातल्या हुक्केरी तालुक्यातील बोरगळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गोपाळ हादीमनी (वय 46) असे वडिलांचे नाव आहे.
तर सौम्या (वय 19), स्वाती (वय 16), साक्षी (वय 12), श्रीजन (वय 10) अशी चारही मुलांची नावे आहेत. गोपाळ हादिमनी यांनी केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. बेळगावमधील संकेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
हुक्केरी तालुक्यातील बोरगळ येथील गोपाळ हादीमनी यांच्या पत्नी जया हादीमनी यांचे दोन महिन्यांपूर्वी म्युकस मायकोसिसमुळे निधन झाले होते. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबच नैराश्येत होते. पत्नीच्या मृत्यूनंतर प्रचंड नैराश्यमुळे पतीने आपल्या चारही मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
गोपाळ हादीमनी हे एक माजी सैनिक होते. शनिवारी सकाळी त्यांनी मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, एकाच घरातली पाच व्यक्तींच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावासह बेळगावमध्ये शोककळा पसरली आहे.