पुण्यातील नामांकित हॉस्पिटलचा प्रकार; पालिकेची नोटीस
पुणे – अत्यवस्थ रुग्णाला चक्क रिक्षातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याचा असंवेदनशील प्रकार पूना हॉस्पिटलमध्ये घडला. यावर महापालिकेने या रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 24 तासांत खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
मार्केटयार्ड परिसरातील 60 वर्षीय व्यक्तीला श्वसन, तर पर्वती पायथा येथील 75 वर्षीय महिलेला न्यूमोनियाची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी या दोन्ही रुग्णांना गुरूवारी (दि. 4) अत्यवस्थ अवस्थेत पूना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्याने या रुग्णांना अतिदक्षता विभागात तत्काळ उपचार न देता ‘दुसऱ्या रुग्णालयात भरती व्हा’ असा सल्ला देत उपचार नाकारले. या दोन्ही रुग्णांची लक्षणे ही करोनाची असल्यामुळे रुग्णालयाकडून उपचारास नकार का देण्यात आला,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याहूनही धक्कादायक म्हणजे रुग्ण अत्यवस्थ असतानाही त्यांना रुग्णवाहिकेची सुविधा दिली नाही. त्याबाबत नातेवाईकांनी महापालिकेकडे तक्रार देताच आयुक्त शेखर गायकवाड यांनी तत्काळ पूना हॉस्पिटलला नोटीस बजावली. दरम्यान, याबाबत पूना हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.
नोटीसमध्ये काय म्हटलंय…
या “दोन्ही रुग्णांना अत्यावश्यक कक्षात दाखल करून घेणे अपेक्षित होते. आयसीयू बेड्स उपलब्ध नसल्यास अद्ययावत रुग्णवाहिकेने संबंधित रुग्णालयात पाठवणे अपेक्षित होते. रुग्णालय बेजाबदारपणे वागले आहे. येत्या 24 तासांत योग्य खुलासा केला नाही तर वैद्यकीय कायद्यानुसार आपल्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल,’ असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.