कराची: पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पाकमधील सिद्धिविनायक मंदिराच्या तोडफोडीनंतर आता सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील खिप्रोमध्ये समाजकंटकांनी कृष्ण जन्माष्टमी दिवशीच कृष्ण मंदिरांची मोडतोड केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी काही समाजकंटकांनी श्रीकृष्णाची मूर्ती तोडली. ही घटना मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुरू असलेल्या सोहळ्यादरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यं कुठल्याही आरोपीला अटक झालेली नाही.
याबाबतची माहिती पाकिस्तानी अॅक्टिव्हिस्ट वकील राहत ऑस्टिन यांनी दिली आहे. त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, मंदिरात जन्माष्टमीची पूजा सुरू असतानाच हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये भाविकांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदूना मारहाण होणे ही सामान्य बाब आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरपासून सुमारे ५९० किलोमीटर अंतरावर रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये शोकडो लोकांनी एका हिंदू मंदिराचे नुकसान केले होते.