धक्कादायक! सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली/ हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा आज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या पीडितेच्या मृत्यूमुळे संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणामुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ लागली आहे.

हाथरस येथे या दलित युवतीवर 14 सप्टेंबरला चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. गंभीर जखमी झालेल्या या युवतीला सोमवारी दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. या युवतीच्या पाठीच्या मणक्‍याला गंभीर इजा झाली होती. तिला अर्धांगवायूही झाला होता.

तिला रुग्णालयात आणल्यानंतरही तिचा जीव वाचवला जाऊ शकला नाही. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला, असे तिच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले.

या पीडित युवतीच्या मृत्यूची बातमी पसरल्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाबाहेर तसेच विजय चौक आणि हाथरस येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. या पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्त्यांनी केली.

या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांना अटक करण्यात आली असून आता त्यांच्यावर हत्येच्या गुन्ह्याचाही खटला चालवण्यात येईल, असेही हाथरसच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले.

गंभीर जखमी झाल्याने अर्धांगवायू…

संबंधित पीडित युवती 14 सप्टेंबरला हाथरसमधील शेतातून बेपत्ता झाली होती. काही कालावधीनंतर ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. आरोपींनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिची जीभ चावली गेल्याने तुटली होती. तिच्या हात-पायांना अर्धांगवायूही झाला होता.

तिला अलिगडमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला दिल्लीला हलवले गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.