लिस्बन (पोर्तुगाल) – पोर्तुगालमध्ये कोविड-19 विरोधी फायझर बायोएन्टेक लस घेतल्यानंतर दोनच दिवसांनी एका परिचारिकेचा मृत्यू झाला आहे. यामुळे फायझर बायोएन्टेक लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याबद्दल जागतिक समुदायाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
सोनिया ऍसिवेडो असे या 41 वर्षे वयाच्या नर्सचे नाव आहे. शुक्रवारी 1 जानेवारी रोजी राहत्या घरीच या नर्सचा अचानक मृत्यू झाला.
करोना विरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत या नर्सने दोनच दिवसांपूर्वी फायझर बायोएन्टेकची लस घेतली होती. मृत्यूपूर्वी सोनिया ऍसिवेडो यांना कोणताही त्रास होत नव्हता. करोना विरोधी लस घेतल्यानंतर त्यांच्यावर लसीचे कोणतेही दुष्परिणामदेखील आढळले नव्हते.
पोर्टो शहरात पोर्तुगीज इन्स्टिट्युट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये बालरोग विभागामध्ये त्या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. दोन मुलांच्या आई असलेल्या सोनिया आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात होत्या. फ्रंटलाईन वर्कर असल्याने करोना विरोधी लसीकरणासाठी त्यांना प्राधान्याने लस देण्यात आली होती.
सोनिया यांचे वडील ऍबिलिओ ऍसिवेडो यांनी आपल्या कन्येच्या आकस्मित मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.