बडोदा- आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना गुजरातमधील बडोदा येथे घडली आहे. वडिलांनी स्वप्नात येऊन आईला माझ्याजवळ पाठव असे सांगितले म्हणून मुलाने चक्क जन्मदात्या आईची हत्या केली. हत्येनंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळल्याची घटना समोर आली आहे. दिव्येश बारिया (वय- 27) असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्येश याने 50 वर्षीय आईच्या धातीत आणि पोटात काच घुसवून तिची हत्या केली. त्यानंतर आईचा मृतदेह घरामागच्या आवारात नेवून त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. त्यानंत मृतदेहाच्या शेजारी उभे राहून त्याने ‘ओम नम: शिवाय’ चा जप सुरू केला. हा प्रकार शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आरोपीच्या बहिनीने सांगितले की, भावाला या कृत्याबद्दल विचारले असता त्याने मला वडिलांनी स्वप्नात येऊन आईला आपल्याकडे पाठवण्यास सांगितल्याची कहाणी सांगितली. असे आरोपीच्या बहिनीने म्हटले आहे.