नवी दिल्ली : आजपर्यंत आपण पोलिसांवर ड्युटीवर असताना स्थनिकांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना वाचल्या आहेत. मात्र ओडिशामध्ये जमावाकडून चक्क सीबीआय टीमवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना सीबीआयची टीम चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापेमारी करण्यासाठी गेली होती त्यावेळी घडली. जमावाचा राग एवढा होता कि टीमला त्यांच्या कचाट्यातून पोलिसांना बाहेर काढावे लागले.
चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने उत्तर प्रदेश, ओडिशासहित १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर छापेमारी केली होती. या छापेमारीत उत्तर प्रदेशमधील छोट्या जिल्ह्यांपासून ते नोएडा, गाजियाबादसारखे मोठे शहर आणि राजस्थानच्या नागौर, जयपूर, अजमेरपासून ते तामिळनाडूमधील कोईम्बतूरसारख्या शहरांचा समावेश आहे.
सीबीआयच्या टीमने ओडिशामध्ये कारवाई करण्यासाठी पोहोचली होती. सीबीआयने सकाळी सात वाजता ढेंकनल येथील सुरेंद्र नायकच्या घऱावर छापा टाकला. सीबीआय टीम दुपारपर्यंत चौकशी करत होती. यावेळी स्थानिक लोक संतापले आणि त्यांनी सीबीआयच्या पथकावर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हातामध्ये काठ्या घेत सीबीआय अधिकाऱ्यांना घेरण्यात आलं आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली. हल्ला करण्यासाआधी लोकांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सुरेंद्र नायकच्या घरातून खेचत बाहेर आणलं होतं. मारहाण सुरु असताना स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली.
सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.