नवी मुंबई – आजपासून सुरू होणाऱ्या एएफसी महिला आशिया कप स्पर्धेपूर्वीच भारतीय संघातील दोन फुटबॉल खेळाडू कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. अशी माहिती भारतीय फुटबॉल महासंघानेच ट्विट करून ही माहिती दिली. बाधित झालेल्या दोन सदस्यांपैकी एक उद्या सलामीच्या सामन्यात अंतिम अकरात खेळणार होती, असे महासंघाच्या सुत्रांनी सांगितले.
भारताच्या वरिष्ठ संघातील दोन सदस्या बाधित आढळल्या असून, त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे महासंघाने म्हटले आहे. पाठोपाठ केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा याला आमचे प्राधान्य असेल. एएफसीने आखून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यास आम्ही बांधिल आहोत. खेळाडूंच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे म्हटले आहे.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी काटेकोरपणे जैव सुरक्षा चक्रात खेळाडूंना ठेवण्यात आले आहे. मात्र, काही तास आधीच यजमान संघातील दोघींना कोविडचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असून, व्यवस्थापनाने त्यांना तातडीने विलगीकरणात ठेवले आहे.
भारताचा सलामीचा सामना उद्याच इराणशी नवी मुंबई येतील डी वाय पाटिल मैदानावर होणार आहे.
दोन खेळाडू बाधित सापडले म्हणून सामना रद्द होत नाही, असे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. खेळण्यासाठी दोन्ही संघातील १३ खेळाडू जर उपलब्ध असतील, तर सामना रद्द होत नाही, असेही ते म्हणाले.