नॉरफॉक, (व्हर्जिनिया)- अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातील एका शाळेतल्या अवघ्या 6 वर्षांच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने किरकोळ भांडणातून शिक्षिकेवर गोळीबार केल्याचे पोलिसांनी आणि शाळेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या गोळीबारात शिक्षिका गंभीर जखमी झाल्या असून अन्य कोणीही विद्यार्थी जखमी झालेले नाही. जखमी शिक्षिकेवर उपचार सुरू असून काल दुपारपर्यंत त्यांची प्रकृती सुधारायला लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्हर्जिनिया प्रांतातील रिचनेक एलिमेंटरी शाळेमध्ये हा प्रकार घडला. या मुलाच्या ताब्यातील शॉटगन ताब्यात घेण्यात आली असून ही बंदूक या मुलाकडे कशी आली, याचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा गोळीबार कसा झाला किंवा कोणत्या मुद्यावरून शिक्षिका आणि विद्यार्थ्यामध्ये भंडण झाले, याचा कोणताच तपशील पोलिसांनी दिला नाही.
अमेरिकेमध्ये गेल्या काही काळापासून स्वैर गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे “गन कल्चर’ला आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांबाबत तेथील लोकप्रतिनिधींमध्ये विचार सुरू आहे. इयत्ता पहिलीत शिकणारया विद्यार्थ्याने शिक्षिकेवर गोळीबार केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे आता ही गरज अधिकच तीव्र झाली आहे.