रेमडेसिविरसाठी अनेक खासगी हॉस्पिटल्सचा तगादा
उपचाराची जबाबदारी महापालिकेने घेण्याची मागणी
पुणे – वाढत्या करोना रुग्णांमुळे अनेक रुग्णालयांत जागा उपलब्ध नाहीत. नातेवाईक प्रचंड धावपळ करून, वशिला लावून रुग्णालयात जागा मिळवतात आणि रुग्णास दाखल करतात. पण, काही रुग्णालये त्यांच्या नातेवाईकांस “रेमडेसिविर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर ऍडमिट केले जाईल’ असे सांगत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांची ही भूमिका अनेकांच्या जीवावर बेतत आहे.
शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा प्रचंड असून रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपत करतात. इंजेक्शन कधी मिळेल, याबाबत काही स्पष्टता नसते. परंतु इंजेक्शन शासनाकडून पुरवले जात असून मागणी जास्त असल्याने रुग्णालये “इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल करू,’ असे सांगत आहेत.
इंजेक्शन रुग्णालयास देखील वेळोवेळी मिळणार आहेत. तसेच नातेवाईकदेखील इतर ठिकाणांहून इंजेक्शन आणून देतात. परंतु यासाठी कालावधी जातो. तोपर्यंत रुग्णास दाखल केले नाही व त्यावर उपचार सुरू केले नाही, तर रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन बाजारात मिळत नाही. शासनाकडून ते थेट रुग्णालयात दिले जात आहे. त्यामुळे रेमडेसिविर आणण्याची अट ठेवू नये, असे आदेश प्रशासनाने रुग्णालयांना द्यावेत.
– दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, मनपा