धक्कादायक ! बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीड : देशात एकीकडे दिवाळीचा उत्साह सुरु होता तर दुसरीकडे बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. घटनेनंतर आरोपी मात्र फरार आहे.

बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात ही घटना घडली. सावित्रा असे पीडित तरूणीचे नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते.

गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.

घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर संबंधित लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. तरुणीला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.