धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केले अत्याचार

संगमनेर  -राज्यात एकपाठोपाठ एक अत्याचाराच्या घटनांनी मन सुन्न होत असतांना नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्‍यात एक तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर दोन महिने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

त्या तरूणाने लग्न करण्यास नकार दिल्याने या तरूणीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने ती वाचली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ओळखीचा फायदा घेत अकोले नाक्‍यावरील एका तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या तरुणीने लग्नाची विचारणा केली असता तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जावून तिचा जवाब नोंदविला असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला. शहर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन अकोले नाका परिसरातील अरबाज पठाण याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले.

याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय तरुणीशी आरोपी अरबाज पठाण याची ओळख होती. त्यातून दोघांमध्ये भेटीगाठी व चर्चा होत असत. कालांतराने या ओळखीचे रुपांतर एकमेकांच्या प्रेमात झाले. संशयित आरोपी अरबाज पठाण हा “त्या’ तरुणीच्या घरी जात असत. तिच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या शुक्रवारी (ता.10) आरोपी पठाण याने असेच गोड बोलून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिने पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला असता आरोपीने आपल्या कुटुंबातील लोक लग्नास तयार नाहीत’ असे सांगत लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने सर्वस्व हरपलेल्या पीडितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या कुटुंबातील सदस्यांनी वेळीच तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्याने पीडितेचा जीव वाचला. रविवारी रात्री ती शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयाच्या सूचनेवरुन पोलिसांनी तिचा जवाब नोंदविला.
अरबाज पठाण याने आपल्या इच्छेविरुद्ध लग्नाचे खोटे अमिष दाखवून गेले दोन महिने शारीरिक अत्याचार केल्याने आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितल्यानुसार पोलिसांनी अकोले नाका परिसरात राहणाऱ्या अरबाज पठाण याच्या विरोधात भादंवि 376 (2) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.